अंतराळप्रवासात जीन थेरपी

  विज्ञानविश्‍व

 मेघश्री दळवी

अंतराळप्रवास हे माणसाचं कित्येक काळापासूनचं स्वप्न आहे. चांद्रमोहिमा किंवा मंगळ योजना या त्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी माणसाने उचललेली छोटी छोटी पावलं आहेत. आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ते मंगळावर माणसांची वसाहत करण्याकडे.या सगळ्या योजनांमध्ये अनंत तांत्रिक अडचणी असतात. पण माणूस नवनव्या तंत्रज्ञानाच्या आधारे त्या अडचणींवर नेहमीच मात करत असतो. मात्र माणसाला स्वत:ला अंतराळात मुक्‍त संचार करताना एक फार मोठी समस्या असते आणि ती म्हणजे अवकाशातलं विकिरण (रेडिएशन).

माणसासाठी एकूण विकिरणांचं प्रमाण हे 1200 मिलीसीवर्टसच्या आत राखणे सुरक्षित असतं. संपूर्ण आयुष्यात जेव्हा जेव्हा क्ष-किरण किंवा इतर कोणतेही विकिरण शरीरावर पडेल त्या सगळ्याची गोळाबेरीज करून हे प्रमाण असतं. पृथ्वीवर साधारणपणे वर्षाला 7 मिलीसीवर्टस इतकंच विकिरण सर्वसामान्य माणसाला मिळतं आणि त्याचे धोके फारसे नसतात.
पृथ्वीचं वातावरण आणि चुंबकीय क्षेत्र ह्या हानिकारक विकिरणांना रोखत असतं. पण एकदा का या क्षेत्राबाहेर गेलं की या किरणांचा थेट मारा होऊ लागतो. अंतराळपोशाख घालूनही हा मारा टाळता येत नाही. आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकावर राहणाऱ्या अंतराळवीरांना किंवा अंतराळात जाऊन आलेल्यांना दिवसाला अर्धा ते एक मिली सीवर्टस विकिरणाचा सामना करावा लागतो. तेही खास संरक्षक पदार्थांचे थर स्थानकात वापरूनदेखील! अशा वेळी मंगळप्रवास किंवा अंतराळात पुनःपुन्हा फिरणे हे या दृष्टीने धोक्‍याचं होऊ शकतं.

विकिरणांमुळे आपल्या डीएनएवर विपरीत परिणाम होतात आणि कॅन्सरची शक्‍यता वाढते. तेव्हा वेगवेगळी स्पेस मिशन्स आणि मंगळावर वसाहतींसारखे प्रकल्प यशस्वी करायचे असतील तर या विकिरणांवर उपाय मिळवलाच पाहिजे. त्यामुळे नासाच्या संशोधनात या विषयाचाही अंतर्भाव असतो. किंबहुना गेल्या चार वर्षांमध्ये नासाने या विषयाला संशोधनात अग्रक्रम दिलेला आहे. अंतराळप्रवासी स्कॉट केली अंतराळस्थानकावर 520 दिवस राहून आला, मात्र परत आल्यावर त्याच्या डीएनएमध्ये बदल झालेले आढळले. त्यातले बरेच बदल काही काळाने नाहीसे झाले आणि डीएनए पूर्वपदावर आले. पण काही बदल मात्र कायमचे असू शकतील, आणि तोच मोठा धोका आहे. डीएनएवरचे विकिरणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी जीन थेरपी वापरून काही सुरक्षा पुरवता येईल का याचा अभ्यास सुरू आहे.

त्यासाठी प्रखर विकिरणातही सुरक्षित राहू शकणाऱ्या टार्डीग्रेड आणि रेडियोडुरान्स या जीवांच्या डीएनएवर संशोधन होत आहे. सोबत डीएनएवर परिणाम झाल्यास त्यावर काय उपाय करता येईल, डीएनए दुरुस्त करता येईल का, केल्यास त्याचे दूरगामी परिणाम काय होतील याच्याकडेही लक्ष दिलं जात आहे. फक्‍त औषधांचा वापर पुरेसा होईल, की आणखी कोणती दुसरी पद्धत वापरावी लागेल याचाही विचार संशोधक करत आहेत. तेव्हा अंतराळप्रवास करून नवनव्या ग्रहांवर वसाहत करण्याचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी विकिरणांवर जीन थेरपी आधी यशस्वी करावी लागेल!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)