अंजुम मौदगिल व अपूर्वी चांडेला ऑलिम्पिकसाठी पात्र

आयएसएसएफ जागतिक नेमबाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी

चॅंगवोन: अंजुम मौदगिल आणि अपूर्वी चांडेला या युवा नेमबाजांनी येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ जागतिक नेमबाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावताना आगामी टोकियो 2020 ऑलिम्पिक क्रीडास्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा बहुमान मिळविला आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या या दोघी पहिल्या भारतीय नेमबाज ठरल्या आहेत.

जागतिक नेमबाजी अजिंक्‍यपद स्पर्धेतील महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात अंजुम मौदगिलने रौप्यपदक पटकावले. तर याच प्रकारांत अपूर्वी चांडेलाने चौथे स्थान निश्‍चित करताना ऑलिम्पिकमधील प्रवेश निश्‍चित केला. अंजुम मौदगिलने 248.4 गुणांची नोंद करताना रौप्यपदकाची निश्‍चिती केली. कोरियाच्या हॅना इम हिने 251.1 गुणांची नोंद करताना सुवर्णपदकाची कमाई केली. तर कोरियाच्याच युनहिया जंग हिने 228.0 गुणांची कामगिरी करताना कांस्यपदकाची निश्‍चिती केली.

अपूर्वी चांडेलाने 207 गुणांची नोंद करताना चौथे स्थान पटकावून ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळविले. तिच्यामुळे ऑलिम्पिकमध्ये भारताला दोन नेमबाजांचा कोटा मिळविता आला आहे. अंजुम आणि अपूर्वी या दोघींनीही अंतिम फेरीत अनेकदा 10 पैकी 10 गुणांचा वेध घेतला. त्यामुळे त्यांची कामगिरी उच्च दर्जाची असल्याचे दिसून आले. त्याआधी पात्रता फेरीत अंजुमने चौथे, तर अपूर्वीने सहावे स्थान मिळविताना अंतिम फेरीत स्थान मिळविले होते.

पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात भारताच्या दीपक कुमारने पात्रता फेरीत चमकदार कामगिरी करताना अंतिम फेरीत धडक मारली. मात्र अंतिम फेरीत सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागल्याने त्याची ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची संधी हुकली. पुरुषांच्या स्पर्धेवर रशिया आणि क्रोएशिया या देशांच्या नेमबाजांनी वर्चस्व गाजविले.

टोकियो ऑलिम्पिकसाठी कोटा निश्‍चित करण्याकरिता जागतिक नेमबाजी संघटनेची ही पहिलीच स्पर्धा असून त्यातून विविध 15 नेमबाजी प्रकारांमधून 60 जागांचा ऑलिम्पिक कोटा निश्‍चित होणार आहे. अंजुम आणि अपूर्वी या दोघींनीही टोकियो ऑलिम्पिकसाठी कोटा मिळविला असला, तरी त्यापैकी भारतीय संघात कोणाची निवड करायची, याबद्दल भारतीय रायफल संघटनेचा निर्णय अंतिम आहे. अद्याप आणखी काही आंतरराष्ट्रीय स्पर्धा बाकी असून त्यानंतर अंतिम निवड चाचणीही होणार आहे. त्यानंतरच टोकियो ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या भारतीय नेमबाजी संघातील सदस्य निश्‍चित होतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)