अंगणवाडी सेविकांच्या धरणे आंदोलनाने जिल्हा परिषद दणाणले

नगर – शासनाकडून आश्‍वासन मिळून देखील अंगणवाडी सेविकांचे प्रश्‍न सुटत नसल्याने विविध मागण्यांसाठी जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेच्या आवारात धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. अंगणवाडी सेविकांच्या प्रश्‍नाकडे होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या जोरदार निदर्शनाने जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून निघाला.

या आंदोलनात संघटनेचे सरचिटणीस कॉ.राजेंद्र बावके, उपाध्यक्ष कॉ.शरद संसारे, सहचिटणीस कॉ.मदिना शेख, कॉ.जीवन सुरुडे, मायाताई जाजू, नंदा पाचपुते, शोभा लांडगे, सुजाता शिंदे, मन्नाबी शेख, रागिणी जाधव, वैजयंती ढवळे, संगीता इंगळे, मनिषा माने, संजीवनी आम्ले, ताराबाई सवंत्सकर, मुक्‍ता हासे आदींसह जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. यावेळी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली.

-Ads-

चार तास चाललेल्या धरणे आंदोलनाने जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारती जवळील रस्ता येण्या-जाण्यासाठी बंद झाला होता. दुपारी उशीरा संघटनेच्या शिष्टमंडळाने महिला बालकल्याणचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी संजय कदम यांना निवेदन देऊन अंगणवाडी सेविकांच्या प्रश्‍ना संदर्भात चर्चा केली. कदम यांनी स्थानिक पातळीवरील प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बजेट दुप्पट करावे, मानधना ऐवजी वेतनश्रेणी द्यावी, टीएचआर बंद करुन सकस व पुरक आहार द्यावा, अंगणवाडी कर्मचार्यांच्या सेवा समाप्ती लाभामध्ये तिप्पटीने वाढ करण्यात यावी, योजनेच्या कामासाठी छापील रजिस्टर व अहवाल फॉर्म मिळावा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लाईन लिस्टीग व बाल आधार कार्ड नोंदणीची सक्‍ती करु नये, जिल्हा परिषदेच्या शाळांना बालवाडीची परवानगी देऊ नये, टिएडीए ची थकित रक्कम त्वरीत मिळावी, सेवा समाप्त झालेल्या कर्मचाऱ्यांना एक रक्कमी लाभाची रक्कम त्वरीत अदा करावी, अंगणवाडी सेविकेच्या पदावर नियुक्ती दिलेल्या मदतनिसांची सेवा ज्येष्ठतेसाठी सलग सेवा धरावी, अतिरिक्त अंगणवाडी केंद्रातील कामाच्या मानधनात वाढ करुन सेविकांची वेठबिगारी बंद करावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांची रिक्त जागा त्वरीत भरावी, बालवाडी सेवा केलेल्या व आता अंगणवाडी केंद्रात नेमणुक झालेल्या सेविकांची बालवाडीची सेवा लाभासाठी ग्राह्य धरावी, प्राथमिक शाळेप्रमाणे अंगणवाडी केंद्रांना एक महिन्याची उन्हाळी सुट्टी द्यावी, मिनी अंगणवाडी सेविकेबरोबरच मदतनिसांचे पद निर्माण करावे, मिनी अंगणवाडीचे रुपांतर मोठ्या अंगणवाडीत करण्यात यावे, तसेच दि.4 ऑक्‍टोबर 2017 शासन आदेशान्वये लाभार्थीच्या पुरक पोषण आहाराची रक्कम वाढवून देण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)