अंगणवाडी सेविकांचे निवृत्तीचे वय 65 वर्षे

संग्रहित फोटो

मंत्रिमंडळाची मान्यता : दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लाभ होणार

मुंबई – राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 65 वर्षे करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अंगणवाडी केंद्रात काम करण्यास शारीरिकदृष्ट्‌या सक्षम असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. सुमारे दोन लाख कर्मचारी अंगणवाडी सेवेत कार्यरत आहेत.

अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीसंदर्भात त्यांच्या संघटनेसोबत झालेल्या चर्चेवेळी सेविकांच्या सेवा समाप्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबत विचारविनिमय झाला होता. त्यानुसार अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांचे सेवा समाप्तीचे वय 60 वर्षे करणे, मानधनात वाढ करणे याबाबतचा शासन निर्णय 23 फेब्रुवारी 2018 रोजी काढण्यात आला आहे. मात्र, त्यांच्या सेवा समाप्तीचे वय 65 वर्षे ठेवण्याबाबत विधानमंडळाच्या मार्च-2018 च्या अधिवेशनात सदस्यांनी मागणी केली होती. त्यानुसार काही अटींच्या अधीन राहून कार्यरत असलेल्या सेविकांचे सेवा समाप्तीचे वय 65 वर्षे ठेवण्याबाबत विचार करण्यात येईल, असे आश्वासन सभागृहास देण्यात आले होते. त्यानुसार आजचा निर्णय घेण्यात आला.

वैद्यकिय प्रमाणपत्र बंधनकारक
सर्वसाधारणपणे 60 वर्षानंतर कोणत्याही व्यक्तीस सक्षमपणे काम करण्यास वैद्यकीय कारणास्तव अडचणी येतात. त्यामुळे वयाची 60 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करणे आवश्‍यक असते. त्यामुळे 1 डिसेंबर 2018 रोजी वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या अंगणवाडी सेविका-मदतनीसांची वैद्यकीय तपासणी करुन त्या काम करण्यास पात्र असल्याबाबतचे सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच त्यांना मानधनी सेवेत ठेवण्यात येणार आहे. शासनाने विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार 60 वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर आणि 63 वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर असे दोन वेळा वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार प्रथमत: तीन वर्षे म्हणजे वयाची 63 वर्षे पूर्ण होईपर्यंत आणि त्यानंतर पुढील दोन वर्षे म्हणजे वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत काम करता येणार आहे.

नव्या अंगणवाडी सेविकाचे वय 60 वर्षेच
नव्याने नियुक्त करण्यात येणाऱ्या (1 नोव्हेंबर 2018 पासून) अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाड्यांच्या एकत्रिकरणानंतर मदतनीसाची अंगणवाडी सेविका म्हणून नेमणूक केल्यास त्यांची मानधनी सेवा 60 वर्षे राहणार आहे. अंगणवाडी केंद्राच्या कामकाजासह माहिती संकलनाचे कामकाज डिजिटल होत असून अंगणवाडी सेविकांना तांत्रिक ज्ञान असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी वेळोवेळी प्रावीण्य परीक्षा आयोजित करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)