अंगणवाडी शिक्षिकांना बाप्पा पावला

मानधनवाढीचा निर्णय : आरोग्य सेवा, रजाही वाढणार


आता प्रतीक्षा फक्‍त स्थायी समितीच्या निर्णयाची

पुणे – अंगणवाडी सेविका व बालवाडी शिक्षिकांना देण्यात येणारे मानधन वाढविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, ज्या अंगणवाडी शिक्षिकांची सेवा 20 वर्षापेक्षा जास्त झाली आहे त्यांना 11 हजार रुपये तर सेविकांना 8 हजार रुपयांचे मानधन दिले जाणार आहे. तसेच ज्या शिक्षिकांची सेवा 20 वर्षापेक्षा कमी झाली आहे, त्या शिक्षिकांना 8 हजार तर सेविकांना 8 हजार मानधन देण्यात येणार आहे.

सध्या या शिक्षिकांना 8 हजार 500 तर सेविकांना 6250 रूपयांचे मानधन दिले जात होते. तसेच या सेविकांना या पुढे महापालिकेच्या शहरी गरीब योजनेचाही लाभ दिला जाणार असून त्यांच्या सुट्टयांमध्येही वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. हा मानधनवाढीचा प्रस्ताव येत्या मंगळवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत ठेवला जाणार आहे.

महापालिकेच्या अंगणवाड्यांमध्ये 515 पैकी 124 शिक्षिका 20 वर्षापेक्षा जास्त सेवा केलेल्या आहेत, तर 423 बालवाडी सेविका असून त्यातील 90 सेविका या 20 वर्षांपेक्षा अधिक सेवा झालेल्या आहेत. या सेविकांना प्रत्येक दोन वर्षांनी मानधन वाढवून देण्याचे धोरण प्रशासनाने 2016 मध्ये मंजूर केले असून त्या धोरणानुसार, शिक्षिकांना सरसकट 8 हजार 500 तर सेविकांना 6 हजार 250 रुपयांचे मानधन दिले जात होते. मात्र, सध्याच्या स्थितीत हे मानधन तोकडे असल्याने ते वाढविण्याची मागणी करण्यात येत होती.

मागील महिन्याच्या मुख्यसभेवेळी या सेविकांनी नगरसेवकांना गुलाब पुष्प देत गांधीगिरी करून मानधन वाढविण्याची मागणीही केली होती. यावेळी मुख्यसभेत झालेल्या चर्चेत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी बालवाडी शिक्षिका व सेविकांसाठी स्वतंत्र धोरण करून मानधनवाढीचा निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले होते. तसेच स्थायी समितीमध्येही मानधनवाढीचे दोन प्रस्ताव दाखल झालेले होते. त्यानुसार, प्रशासनाने हा सुधारित प्रस्ताव तयार केला आहे.

शहरी गरीब योजनेचा लाभही मिळणार
या शिक्षिका तसेच सेविकांना केवळ मानधनवाढच नाही, तर त्यांच्या नैमित्तीक सुट्ट्या वाढविण्याचा तसेच त्यांना महापालिकेच्या शहरी गरीब वैद्यकीय योजनेचा लाभ देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, या शिक्षिका व सेविकांना वर्षाला 200 रुपये भरून आरोग्य विभागाकडील शहरी गरीब योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यात काही आजारांवर 1 लाखांपर्यंत तर काही आजारांवर 2 लाखांपर्यंत वैद्यकीय उपचार मिळणार आहेत. तसेच महापालिका रुग्णालयांमध्ये मोफत उपचार व मध्यवर्ती औषध केंद्रातून मोफत औषधेही दिली जाणार आहेत. या शिवाय त्यांना शिक्षण विभागाकडील सुट्ट्या, शनिवारची अर्धी सुट्टी व रविवारच्या पूर्ण सुट्टी व्यतिरिक्त वार्षिक कमाल 10 नैमित्तीक रजाही दिल्या जाणार असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)