अंकुचे मकरसंक्रांतीचे चॉकेट!!!

मकरसंक्रांत म्हंटले की “नाही मी नाही देणार हे आमचे चॉकेट आहे” असे बोलणारी अंकु आठवते. अंकु माझ्या मावशीची मुलगी. दोन वर्षाची होती तेव्हा आम्ही सगळ्यांनी मकरसंक्रांतीला तिच्यासाठी बोरस्नानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मी मस्त तीळ-गुळाचे दागिने केले होते अंकु साठी; कानातले, बाजूबंद, गळ्यात रंगबेरंगी हार, पायात न वाजणारे पैंजण, कमरबंद अगदी सगळं काही केले होते. खूप गोड दिसत होती अंकु त्या दिवशी. मकरसंक्रांतीला वाण वाटण्याची एक खूप सुंदर परंपरा असते. आपल्याला आवडेल अशी एखादी वस्तू स्त्रिया वाण म्हणून एकमेकीनां देतात. तसेच मावशीने अंकुचे बोरस्नान आहे असे सगळ्यांना सांगितले होते. म्हणून सगळे जण घरी जमले होते. आई आणि मावशी चॉकलेटस, बोरं, वेगवेगळ्या आकाराचे बिस्किट्‌स, भेळ हे सगळं एकत्र करत होत्या. एवढे सगळं बघून अंकु खूप खुश होती.

मी पाट सजवला होता ज्याच्यावर अंकुला बसवायचे होते. कार्यक्रम सुरु झाला अंकुच्या हाताला धरून तिला पाटावर बसवले आणि मी तिच्या शेजारी बसले. सुरुवात मावशीने केली ताटातले एकत्र केलेले मिश्रण म्हणजेच बोरं, चॉक्‍लेटस, बिस्किट्‌स हे सगळं दोन्ही हाताच्या ओजंळीत घेऊन अंकुच्या डोक्‍यावर टाकले आणि तिला ह्या सर्व पदार्थांनी आंघोळ घातली ज्याला आपण बोरस्नान म्हणतो. हे सगळं बघून अंकु भारावून गेली होती पण तेवढ्यात तिच्या अंगावरुन चॉक्‍लेटस जसे-जसे खाली पडायला लागले तशी सगळी लहान मुले चॉकलेट्‌स उचलायला पुढे सरसावली आणि त्यामध्ये अंकुचा नंबर पहिला होता. सगळे चॉकलेट्‌स एकटीने गोळा केले आणि सगळ्या लहान मुलांकडे बघत म्हणाली “नाही मी नाही देणार हे आमचे चॉकेट आहे” हे माझ्या मम्मीने आणले आहेत. तेव्हा तिची मम्मी आली आणि तिला समजवायला लागली, अंकु आताच काही दिवसांपूर्वी आपण नवीन वर्षाचे स्वागत केले ना; होकारार्थी मान हालवत ती हो म्हणाली , मग आजच्या सणाला सगळ्यांना गोड गोड द्यायचे असते आणि नवीन-नवीन मित्र-मैत्रिणी बनवायच्या असतात. देणार ना मग चॉकलेट्‌स सगळ्यांना असे मावशीने अंकुला विचारले? त्यावेळेस तीला हे पटले होते की नाही हे माहित नाही पण मला “तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला’ याचा नवीन पैलू समजला होता. बिचारी अंकु मात्र मम्मीने सांगितले म्हणून तीने तिच्या चॉकेट वर पाणी सोडले होते. आज ही तो दिवस आठवला की अंकुच्या मकरसंक्रांतीच्या चॉकेटमध्ये हरवून जाते हे मन.

-Ads-

तेवढ्यात माहित नाही कुठून तरी करपल्याचा वास येऊ लागला. आई जोरात ओरडली, अगं तीळ करपायला लागले गॅस बंद कर. कुठे लक्ष आहे तूझे? एवढे सगळे कानावर पडल्यानंतर मकरसंक्रांतीच्या आठवाणींमध्ये हरवलेली मी भानावर आले आणि पटकन गॅस बंद केला. मकरसंक्रांतीच्या दिवशी माझ्या आईच्या हातचे तीळाचे लाडू खायला सगळे जण आवर्जून घरी येतात त्या निमित्ताने सगळ्यांची भेट होते,गप्पा होतात. लाडू वळताना नेहमी प्रमाणे आईने सणाचे महत्व सांगायला सुरुवात केली. “मकरसंक्रांत हा पौष महिन्यातील पहिला सण. जेव्हा थंडीही प्रचंड जाणवते म्हणून तीळ आणि गुळ हे उष्ण पदार्थ खायचे असतात. आणि संक्रांती निमित्त हे दोन्ही पदार्थ आपल्या शरीराला मिळतात.

तसेच रसंक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी साजरीे करतात त्यासाठी ऊस,हरभरा, बोरे, तीळ यामध्ये अनेक भाज्या घालून भोगीची भाजी बनवली जाते ज्याला तुम्ही आज कालच्या मुली मिक्‍स भाजी म्हणता’ असे म्हणत तिने मला एक टोमणा देखील मारला. आणि मकरसंक्रांती दिवशी सर्वांना तीळ गुळ देऊन….हो गं हो आई माहिती आहे तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणतो म्हणजेच अंकुचं मकरसंक्रांतीचे चॉकेट;आईला पण हे ऐकून हसू फुटले म्हणून हातातल्या लाडूचा आकार बिघडला. तोच बीघडलेला लाडू हातात घेऊन आईला म्हणाले धर तू पण घे अंकुचे चॉकेट आणि गोड गोड बोल.

– प्राजक्ता जाधव

What is your reaction?
3 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)